पुणे ! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
मुख्य संपादिका बालिका निरगुडे

पुणे ! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
पुणे: पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी परिसरातील चर्च चौक येथे 31 जुलैच्या रात्री पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना खडकी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
जखमी झालेल्या पोलिसांची नावे गोपाल देवसिंग कोतवाल आणि श्री. काजळे अशी आहेत. गोपाल देवसिंग कोतवाल आणि श्री. काजळे हे दोघे मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनचालक अतिशय वेगात व वेडीवाकडी गाडी चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला थांबवून विचारणा केली. मात्र, या क्षुल्लक कारणावरून वाहनात असलेल्या चार जणांनी संतप्त होऊन पोलिसांवर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले व बेदम मारहाण केली. घटनेनंतरजखमी पोलिसांनी तातडीने खडकी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि गोपाल देवसिंग कोतवाल यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. जुनेद इक्बाल शेख (वय 27), नफीज नौशाद शेख (वय 25), युनूस युसुफ शेख (वय 25), आरिफ अक्रम शेख (वय 25) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
दरम्यान, आरोपींच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपींवर सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तींवर ड्युटीदरम्यान हल्ला केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.